लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा व भातकुली नगरपंचायतीची निवडणुकीत २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. रविवारी प्रचार तोफा थंडावल्या. सोमवारी ‘कत्ल की रात’ आहे. मात्र, दगाफटका टाळण्यासाठी तिवस्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर, तर भातकुलीत आमदार रवि राणा हे तळ ठोकून आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनीसुद्धा विजयासाठी रणनीती आखली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, त्याचे प्रतिबिंब तिवसा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दिसून आले. ओबीसी जागा वगळून ही निवडणूक होत आहे. तिवसा येथे सेना-राष्ट्रवादीची युती आहे. काँग्रेस, भाजपा, युवा स्वाभिमान, प्रहार, माकप, भाकप, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत.तिवसा नगरपंचायतीची निवडणूक ही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. ती कायम राखण्यासाठी पालकमंत्री ठाकूर येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबतीला आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत आदी काँग्रेस नेत्यांच्या फळीने प्रचारात मुसंडी मारली आहे. युवा स्वाभिमान उमेदवाराच्या विजयासाठी आमदार रवि राणा, खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रचार केला. भाजप उमेदवारांसाठी आमदार प्रवीण पोटे, निवेदिता चौधरी, सेनेसाठी राजेश वानखडे, वंचित आघाडीच्या उमेदवारासाठी शैलेश गवई, सुधीर वानखडे, बसपासाठी चेतन पवार आदींनी जिवाचे रान केले आहे. नामाप्रच्या जागा वगळता तिवसा येथे १६ तर, भातकुलीत १४ जागांसाठी निवडणूक होत आहे.
तिवसा, भातकुलीत कोण मारणार मुसंडी?भातकुली नगरपंचायत निवडणुकीत सेना-काँग्रेसची युती आहे. भातकुलीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी राणा दाम्पत्याने पडद्याआड राजकीय खेळी सुरू केली. कॉर्नर सभा, पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला. आमदार रवि राणा तळ ठोकून आहेत. भातकुलीत युवा स्वाभिमान, सेना, भाजप अशी तिरंगी लढत आहे. तिवसा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर सभा, पदयात्रा, डोअर टू डोअर भेटी घेतल्या. भाजप, सेनेनेदेखील जोरात प्रचार चालविला. त्यामुळे आता तिवसा व भातकुली नगरपंचायतीत कोण मुसंडी मारणार, याकडे नजरा लागल्या आहेत.