अमरावती : प्रगतिशील लेखक संघाचे राज्य अधिवेशन अमरावती येथे २२ डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले हे राज्य अधिवेशनाचे अध्यक्षपदी राहतील. सिनेअभिनेता तथा लेखक वीरा साथीदार हे अधिवेशनाचे उद््घाटन करणार आहेत.
अमरावती येथील एकदिवसीय राज्य अधिवेशनात सकाळी उद््घाटनानंतर एका परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर संघटनात्मक चर्चासत्र होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लेखक, कलावंत, समीक्षक सहभागी होणार आहेत. स्थानिक रेल्वे स्थानकासमोरील ऊर्जा भवन येथे प्रगतिशील लेखक संघाच्या जिल्हा पदाधिका-यांची यानिमित्त रविवारी बैठक पार पडली. अधिवेशनाचे स्थळ लवकरच निश्चित केले जाणार आहे.
पुढील आठवड्यात प्रगतिशील लेखक संघाचे राज्याचे सचिव राजेश वानखडे हे देखील अमरावतीला येथे येणार आहेत. जिल्हाध्यक्ष प्राचार्य काशीनाथ ब-हाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रास्ताविक सचिव प्रसेनजित तेलंग यांनी केले. संघाच्या जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाबाबत त्यांनी माहिती दिली. बैठकीला शाहीर धम्मा खडसे, गौतम खोब्रागडे, महेंद्र मेटे, अंबादास घुले, भगवान फाळके, विजय रोडगे, भूमिका वानखडे आदी उपस्थित होते.