अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. असे असले तरी नागरिक अकारण रस्त्यावर गर्दी करीत असून, कोरोना संसर्गास फैलाव मदत करीत आहेत. त्यामुळे गर्दी कमी करणे, नागरिकांनी सुरक्षितता, यासाठी पोलिसांनी मंगळवारी नागपुरी गेट, खोलापुरी गेट ठाण्यांच्या हद्दीत रूट मार्च केला.
पोलीस आयुक्त आरती सिंह याच्या आदेशानुसार पोलिसांच्या रूट मार्चने शारीरिक अंतर, मास्कचा वापर करणे, कोरोना नियमांचे पालन करणे आदींचा संदेश दिला. नागपुरी गेट पोलीस ठाणे ते पठाण चौक, चार खंबा, ताजनगर, जमील कॉलनी, असोरिया पेट्रोल पंप मार्गे परत पोलीस ठाणे असे रूट मार्चने मार्गक्रमण केले. त्यानंतर खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजीबाजार, अंबागेट, हनुमाननगर, खरकाडीपुरा ते खोलापुरी गेट पोलीस ठाणे असे पोलिसांच्या रूट मार्चने मार्गक्रमण केले. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, गजानन तामटे यांच्या नियंत्रणात १४ पोलीस अधिकारी, १३५ अंमलदार, क्यूआरटी, आरसीपी, दामिनी पथक, चारचाकी वाहने, १० दुचाकी वाहने व दोन मोठ्या शासकीय वाहनांचा समावेश होता.