अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूपदासाठी गत दोन दिवसात ४३ उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या असून, या पदावर परिवारातून नागपूरकरांचा डोळा आहे. मात्र, दुसरीकडे विद्यापीठात बहुमतात असलेल्या ‘नुटा’ संघटनेने सुद्धा कुलगुरूपदासाठी फिल्डींग लावली आहे. मुंबईच्या एका ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्या तरी कुलगुरूपदासाठी नामांकन अर्ज मागविणे ते मुलाखती घेणे यादरम्यान सुमारे २० लाखांचा खर्च होणार असल्याची माहिती आहे.
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ४३ पात्र उमेदवारांच्या ‘शॉर्ट लिस्ट’नुसार ११ व १२ जानेवारी रोजी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आता अंतिम पाच जणांची यादी तयार करण्याची किमया समितीला करावी लागेल. त्यामुळे निवड समितीच्या मुलाखतीत कोणत्या उमेदवारांनी थेट प्रश्नांना उत्तरे दिली आणि कोण फेल झाले? हे पाच जणांची शॉर्ट लिस्ट तयार झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
अनेक जण कुलगुरूपदासाठी ईच्छुक असले तरी राजकीय पाठबळशिवाय कुलगुरूपदाची खुर्ची मिळणे शक्य नाही. हल्ली अमरावती विद्यापीठात ‘नुटा’ संघटनेची चलती असून, सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेवर त्यांचाच बोलबाला आहे. मात्र, काहीही झाले तरी अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू हे नागपूरकर असतील अशी रणनीती आखली जात आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू ‘नुटा’ की ‘शिक्षण मंच’ कोणाचे असणार, याकडे नजरा खिळल्या आहेत.
बाराहातेंचे कनेक्शन कुणाशी?अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ४३ उमेदवारांच्याचाच मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यात नागपूर येथील डॉ. मिलिंद बाराहाते यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगत आहे. अद्याप पाच उमेदवारांची यादी तयार झाली नाही, तरीही मुलाखती होताच डॉ. बाराहाते यांचे नाव ‘फायनल’ असे उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज बोलू लागले आहे. त्यामुळे डॉ. बाराहाते यांचे ‘नुटा’ कनेक्शन तर नाही ना? अशीच शंका उपस्थित होत आहे. डॉ. बाराहाते यांचे राजकीय पाठबळ जोरात असल्यामुळेच तेच कुलगुरू होतील, अशी माहिती आहे.