देहविक्री प्रकरण : गाडगेनगर पोलीस करणार चौकशीअमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत आनंदवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये देह विक्रीचा प्रकार उघड झाला होता. त्या फ्लॅटचे मालकी नायब तहसीलदार असलेल्या व्यक्तीकडे असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्या अनुषंगाने आता गाडगेनगर पोलीस ‘त्या’ नायब तहसीलदाराची चौकशी करणार आहेत. २४ फेब्रुवारीरोजी आनंदवाडी परिसरातील एका इमारतीमधील दोन फ्लॅटमधून देहविक्री व्यवसायातील पाच तरुणी, दोन महिला एजन्ट व एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन एजन्ट महिलांनी फ्लॅट भाड्याने घेवून देह विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यापूर्वी या दोन्ही महिला साईनगर परिसरात देहविक्री करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. मात्र, देहविक्री करणाऱ्या महिलांना दोन फ्लॅट भाड्याने देणाऱ्या व्यक्तीचा सुगावा लागलेला नव्हता. तपासादरम्यान ही बाब आणि खरा फ्लॅट मालक उमगला आहे. (प्रतिनिधी)एका महिलेचा जामीन अर्ज फेटाळलातरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या महिलेने पोलीस रेकार्डवर चुकीने नाव व पत्ता दिल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पोलिसांना चांदुरबाजार येथील पत्ता देण्यात आला. त्या पत्त्याची शहानिशा केल्यावर तो पत्तासुध्दा चुकीचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यानंतर या महिलेला ओळखपत्र मागितले. ते ओळखपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्यावर ते ओळखपत्रसुध्दा चुकीचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या महिलेची जामीन न्यायालयाने नाकारला आहे. युवकाचा अटकपूर्व जामीन मंजूरदेह विक्री व्यवसायावर धाड टाकून पोलिसांनी अतुल इंगळे याला ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यापूर्वी अतुलने फ्लॅटमधील गॅलरीतून उडी मारली होती. त्यावेळी अतुलचे दोन्ही हात तथा कमरेच्या भागाला दुखापत झाली. पोलिसांनी त्याला इर्विनमध्ये दाखल करून नोटीस बजावली होती. त्यानंतर अतूलने वकीलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. अतुलतर्फे अनिल विश्वकर्मा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अतुल प्रॉपर्टी ब्रोकर असल्याने तो कामानिमित्त गेला होता. पोलिसांची धाड पडताच तो घाबरून खाली कोसळला, असा युक्तिवाद विश्वकर्मा यांनी न्यायालयात केला. त्यानंतर अतुलचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. देहविक्री प्रकरणातील एका महिला आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. अतुल इंगळेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. ते दोन फ्लॅट एका नायब तहसीलदाराच्या मालकीचे असून त्यांनाही याबाबत विचारणा करण्यात येईल. - के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.
'त्या' फ्लॅटचे मालक नायब तहसीलदार
By admin | Published: March 08, 2016 12:11 AM