अमरावती : नायब तहसीलदार यांना राजपत्रित गट (ब) चा दर्जा दिला, वेतन मात्र वर्ग ३ चे देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रेड वेतन ४३०० वरून ४८०० रुपये करण्याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांद्वारा महसूलमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.
याच मागणीसाठी जिल्ह्यात ३ ते ६ एप्रिल २०२३ दरम्यान संघटनेद्वारा बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले होते. या मागणीवर कार्यवाहीसाठी शासनाने अवधी मागितला होता. त्यामुळे संघटनेद्वारा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, शासनाने अद्याप प्रक्रिया केली नसल्याने पुन्हा ‘ग्रेड पे’चा मुद्दा तापला आहे. यासह संघटनेद्वारा अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या व निवेदन प्रभारी विभागीय आयुक्त गजेंद्र बावने यांना देण्यात आले.
मंगळवारच्या आंदोलनानंतर १८ डिसेंबरला पुन्हा धरणे आंदोलन व २८ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनात विभागीय अध्यक्ष संजय खडसे, उपजिल्हाधिकारी राम लंके, वैशाली पाथरे, अनिल भटकर, शिवाजीराव शिंदे, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, श्यामकांत मस्के यांच्यासह जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे उपाध्यक्ष अरविंद माळवे, सचिव अशोक काळीवकर, सहसचिव अविनाश हाडोळे, कोषाध्यक्ष प्रवीण देशमुख, निकिता जावरकर, वैभव फरतारे, नीलेश खटके, भाग्यश्री देशमुख, आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी होते.