परतवाडा: अचलपूर तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना १८ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारला सायंकाळी ताब्यात घेतले. चार दिवसापूर्वी श्रीराव यांनी रेतीचा ट्रक पकडला. हा ट्रक तहसील कार्यालय परिसरात उभा आहे. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रे-माहिती आरटीओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला २० हजार रुपये लाच मागितली होती.
दरम्यान संबंधिताने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या केबिनमध्येच १८ हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या श्रीराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात अमरावती घटकाने ही कारवाई केली.