प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निम्न पेढी प्रकल्पबाधित असलेल्या कठोरा-रेवसा मार्ग स्थित अळणगाव पुनर्वसित गावातील खुल्या भूखंडाची बेभाव विक्री करण्यासाठी चक्क कठोरा ग्रामपंचायतच्या नमुना ८ चा वापर करण्यात आला. चक्क शासकीय मालकीच्या भूखंडावर मालक म्हणून खासगी व्यक्तीचे नाव चढविण्यात आले. त्यामुळे कठोरा ग्रामपंचायतीशी संबंधित काळातील सचिव संशय चक्रात आले आहेत.अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना कठोरा-रेवसा मार्गावर दिलेले अनेक भूखंड अद्याप शासनदरबारी रिक्त आहेत. पैकी क्रमांक १७ चा भूखंड विक्रीचा घाट रचण्यात आला. त्यासाठी भूखंडमालक म्हणून कठोरा ग्रामपंचायतकडून चाळके नामक व्यक्तीचे नाव चढविण्यात आले. तसा सन २०१९/२० या आर्थिक वर्षात नमुना ८ देण्यात आला. अशाप्रकारे यापूर्वी बोगस नमुना ८ घेऊन किती भूखंड विकण्यात आले, ग्रामपंचायतमधून किती आठ ‘अ’ देण्यात आले, हे शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
एवढ्यात ठरला होता व्यवहारतक्रारीनुसार, ७४० चौरस मीटर अर्थात ८११० चौरस फूट भूखंडविक्रीचा व्यवहार १० लाख ७३ हजार इतक्या अत्यल्प किमतीत ठरविण्यात आला होता. संबंधिताने ती रक्कम एकाला दिली. मात्र, खरेदीच्या आधी आवश्यक असलेला नमुना ८ हाती आल्यानंतर या बोगस प्रकरणाचे, व्यवहाराचे बिंग फुटले.
संबंधित ग्रामसेवकाच्या चौकशीची गरजमौजे अळणगाव (पुनर्वसन) ला जोपर्यंत महसुली दर्जा मिळत नाही, तोपर्यंत या पुनर्वसित गावठाणचा समावेश माैजा कठोरा ग्रामपंचायतीत करण्यात आला आहे. येथील भूखंड विक्रीसाठी वा बांधकाम परवानगीसाठी कठोरा ग्रामपंचायतच्या करविषयक नमुना ८ ची गरज आहे. जो शासकीय व रिक्त भूखंड चाळके यांच्या नावे दाखविण्यात आला, त्यावर कठोरा ग्रामपंचायतचा शिक्का आहे. संबंधित ग्रामसेवकाची स्वाक्षरीदेखील आहे. त्यामुळे ती स्वाक्षरी खरी की खोटी, हे पाहण्यासाठी चौकशीची आत्यंतिक गरज आहे.
पुनर्वसन विभाग अनभिज्ञ कसा ?मौजा अळणगाव येथील भूखंडाची यादी पुनर्वसन विभागाकडे आहे. कोणता भूखंड कुणाला दिला, कुठला रिक्त आहे, याची नोंद आहे. शासकीय नोंदीनुसार, जो १७ क्रमांकाचा भूखंड रिक्त आहे, त्याच भूखंडाचे मालक म्हणून चाळके यांच्या नावे नमुना ८ देण्यात आला. विभागातील काही कर्मचारी यात गुंतलेल्या दलालाला चेहऱ्यानिशी ओळखतात. मात्र, प्रकरणापासून ते अनभिज्ञ आहेत.
कमिशन २५ टक्के ? तक्रारीनुसार, संपूर्ण व्यवहार १० लाख ७३ हजार रुपयांत ठरला असताना, तेथील दुसराच भूखंड दाखविण्यात आला. यात तिसऱ्याच रिक्त भूखंडाचा नमुना ८ दाखविण्यात आला. रिक्त जागेवर तिसराच मालक म्हणून चढविला गेल्याने संबंधितांचे खिसे गरम करावे लागतील, दोन ते तीन लाख रुपये लाच द्यावी लागेल, असेही खरेदीदाराला सांगण्यात आले. त्यामुळे बोगस नमुना ८ देण्यासाठी कुणाकुणाचे खिसे गरम झालेत, त्यासाठी चौकशी होणे गरजेचे ठरले आहे.
तक्रार प्राप्त झाली. कठोरा ग्रामपंचायतचा नमुना आठ खरा की बनावट, हे शोधण्याचे आदेश अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. याबाबत पुनर्वसन विभागाकडूनदेखील माहिती मागविण्यात येईल.- डॉ. विजय राहाटे, गटविकास अधिकारी, अमरावती