मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यातील ब्रिटिशकालीन बोरगाव निस्ताने येथे हनुमान जयंतीचा उत्सव शनिवारी उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांनी बोरीच्या काट्यावरून लोटांगण घालत मारुतीचे दर्शन घेतले. या गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, येथे जन्मताच प्रत्येक मुलीचे पिसी, मुलाचे भोपत असे नाव ठेवले जाते. यामागे शेकडो वर्षांची परंपरा आहे.नदीच्या काठावर लक्ष्मी माता, मरामाय, तेलंगामाय, मारुती यांचे मंदिर आहेत़ पुरातन लक्ष्मी माता मंदिराचे बांधकाम माजी जि़प़सदस्य रामदास निस्ताने यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी केले. चैत्र महिन्यात लक्ष्मीमाता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर हनुमान जयंती सोहळा थाटात झाला. या दिवशी दुपारी गावातील युवक व वृद्धांनी वर्धा नदीत आंघोळ करून नदीपासून मंदिरापर्यंत बोरीच्या काट्यावरून उघड्या शरीराने अर्धा किमी लोटांगण घातले. लक्ष्मी माता व मारोती मंदिरात आपण जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होते़, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे़.
मुलाचे जन्मनाव भोपत तर मुलीचे पिसीवर्धा नदीच्या काठावर असलेल्या १२ गावांची श्रद्धा लक्ष्मी मातावर अधिक आहे. मुलगा वा मुली जन्मल्यानंतर त्याला सर्वप्रथम या मंदिरात घेऊन येतात. मुलाच्या कानात ओरडून भोपत, तर मुलीच्या कानात पिसी असे ओरडून प्रथम नाव ठेवले जाते. भोपत म्हणजे लक्ष्मीमातेचा पुजारी व पिसी म्हणजे देवीची भक्ती करणारी महिला, अशी श्रद्धा आमची असून, शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असल्याचे येथील आर्किटेक राजेश्वर निस्ताने यांनी सांगितले़