अमरावती : इप्राईमसेल नावाच्या ऑनलाईन चेन मार्केंटिंग (नेटवर्क मार्केंटिंग) मध्ये परिवारातील सदस्यांना पैसे गुंतवविण्यास सांगून युवकाला २ लाख ८१ हजारांनी फसविल्याची घटना वहेदत कॉलनीत १९ सप्टेंबर २०२० ते २ जुलै २०२१ दरम्यान घडली.
याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी इप्राईमसेलचे संचालक मनोज कमलाकर कापसे (रा. कापसे प्लॉट नंबर ८३ खरबी रोड नागपूर, उत्तम आनंद पटेल (रा. इंद्रमात नगर नागपूर, पुष्पक किशोर पटेल (रा. साई कॉलनी तिरोरा जि. गोंदिया व एका महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदानुसार शुक्रवारी नोंदविला.
याप्रकरणी फिर्यादी इमरान खान मकसूद अली खान (रा. वहेदत कॉलनी वलगाव रोड) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी यांनी इप्राईमसेल कंपनीच्या साईडवर फिर्यादी व त्याची पत्नी, भाऊ यांनी ऑनलाईन आयडी तयार करून रजिस्टर केले. यामध्ये चेन तयार करून सदर कंपनी त्यांनी तयार केलेल्या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग एमओयू नियमाचे पालन न करता युवकाचे २ लाख ८१ हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर करीत आहेत.
बॉक्स
कोट्यवधींनी फसवणुकीची शक्यता
इप्राईमसेलच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी पाच हजारांपासून एका लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याने यात कोट्यवधींची फसवणुकीची शक्यता असल्याचे सायबर पोलिसांनी वर्तविले आहे. नागरिक इप्राईम सेलच्या माध्यमातून ऑनलाईन वस्तू खरेदी करतात. ती कंपनी वस्तू चढ्या दराने विक्री करते. त्यानंतर नागरिकांना पैशाचा परतावा करते. मात्र, नागरिकांना ९० दिवसांपर्यंत पैसे काढता येत नाही. मात्र, काही नागरिकांना ९० दिवसांनंतरही पैसे परत न मिळाल्याने व नागपूर येथील कंपनीच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळत फोन बंद केल्याने बिंग फुटले. फिर्यादीसह ५० लोकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविल्याची माहिती आहे. प्रत्येकाने यात मेंबरशिप केली असून, याची चौकशी झाल्यास यात कोट्यवधींची गुंतवणूक असण्याची शक्यता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत वर्तविली जात आहे.