---------
फोटो - पी/०८/अनिल कडू
जिल्हा परिषदेच्या हायस्कूलसह विद्यालयांची निर्मिती
परतवाडा : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० च्या शिक्षक मतदार यादीत प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नावासमोर नमूद जिल्हा परिषदेच्या हायस्कूलसह विद्यालयांची नावे संशयास्पद आहेत. यात ज्या गावात जिल्हा परिषदेचे हायस्कूल आणि विद्यालय नाही, अशा गावांतही शाळा-विद्यालये यादीत समोर आली आहेत.
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत अचलपूर शहरात जिल्हा परिषदेचे एकमेव हायस्कूल आहे. निवडणूक विभागाकडून प्रसारित मतदार यादीतील भाग क्रमांक ५ मध्ये चमक खुर्द आणि गौरखेडा कुंभी येथे, तर भाग ६ मध्ये उपातखेडा व गोंडवाघोली येथे जिल्हा परिषदेचे हायस्कूल दाखविण्यात आले आहे.जिल्ह्यात कुठेही जिल्हा परिषदेचे विद्यालय नाही. विद्यालयाची संकल्पनाच नसताना मतदार यादीत सावळापूर, मल्हारा, धामणी, कोल्हा, धोतरखेडा येथे जिल्हा परिषदेचे विद्यालय नमूद आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक शिक्षकांनी मतदान केल्यामुळे त्यांच्या नावांची शिक्षणक्षेत्रात चांगलीच चर्चा रंगत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक दर्जाच्याच आहेत. या शाळांना माध्यमिक शाळांचा दर्जा नाही. दुसरीकडे भारताचे संविधान कलम १७१ (३) (ग) नुसार माध्यमिक शाळेचा दर्जा प्राप्त किंवा त्याहून वरचा दर्जा प्राप्त शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांनाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. यामुळे मतदार यादीत प्राथमिक शिक्षकांची नावे मतदार म्हणून नोंदणी करून घेणाऱ्या तालुका व उपविभागीय पातळीवरील निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केल्या जात आहे.
कोट
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत अचलपूरला जिल्हा परिषदेचे एक हायस्कूल आहे. या व्यतिरिक्त तालुक्यात जिल्हा परिषदेचे कुठेही हायस्कूल नाही. जिल्हा परिषद विद्यालय एकही नाही. तालुक्यात अचलपूर येथील हायस्कूल वगळता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा शाळा आहेत. या शाळांना माध्यमिकचा दर्जा प्राप्त नाही.
- रूपराव सावरकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अचलपूर.