माफीचा साक्षीदार सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’; नाना पटोलेंची खोचक टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 05:17 PM2022-06-03T17:17:49+5:302022-06-03T17:33:20+5:30
‘खोटे बोला; पण रेटून बोला,’ असा चंग भाजपने बांधला आहे. परंतु, कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सचिन वाझेप्रकरणी जे काही वास्तव असेल, ते नक्कीच पुढे येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
अमरावती : १०० कोटी वसुलीप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’ होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षड्यंत्र होते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केली.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात धनगर कार्यकर्ता परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पटोले म्हणाले, सचिन वाझे हे प्रकरण पूर्णत: बनावट आहे. हे मी विधानसभा अध्यक्ष असताना त्यावेळी भाजपचे नेते ज्या पद्धतीने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, तेव्हा लक्षात आले होते. मात्र, विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे मला याविषयी मत नोंदविता आले नाही, तथापि, वाझे प्रकरणातून राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कुटील डाव भाजपने रचला. म्हणूनच सचिन वाझे याचा १ जून राेजी विशेष सीबीआय न्यायालयाने ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी अर्ज मंजूर केला, अशी टिप्पणी त्यांनी केली.
खोटी व्यवस्था निर्माण करण्यात भाजपचा हातखंडा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करायचे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला,’ असा चंग भाजपने बांधला आहे. परंतु, कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सचिन वाझेप्रकरणी जे काही वास्तव असेल, ते नक्कीच पुढे येईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर कॉंग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, ॲड. दिलीप एडतकर, आदी उपस्थित होते.