सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 06:36 PM2022-06-03T18:36:41+5:302022-06-03T18:37:17+5:30
देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.
अमरावती : भारत अखंड राहावा, हिंदू- मुस्लीम एकत्र नांदावेत. दोन्ही समाजांनी धार्मिक तेढ टाळावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसजनांकडून स्वागत आहे. पण, याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे व्यक्त केली.
नाना पटोले यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प मेळाव्यात सोनिया गांधी यांनी ‘भारत जोडो’चे आवाहन केले आहे. देशात जातीय, धर्मांध व्यवस्था मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने भारताची बदनामी, नाचक्की होत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी त्यादिशेने प्रयत्न व्हावेत, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. नेमके त्याच दिशेने सरसंघचालक डॉ. भागवत यांनी वक्तव्य केले आहे.
त्यांच्या वक्तव्याचे निश्चितच स्वागत आहे. तथापि, याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी ताठ मानेने उभा राहिला पाहिजे. केंद्रीय व्यवस्था शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या मित्र उद्योजकांच्या बाजूने उभी होत आहे. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली.