- वैभव बाबरेकरअमरावती - 'स्मार्ट' पोलीस ठाण्याचा प्रथम दर्जा फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर आता लवकरच नांदगाव पेठ व बडनेरा पोलीस ठाण्याचाही स्मार्ट ठाण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही ठाण्यांमध्ये मूलभूत व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. स्मार्ट पोलीस ठाणे म्हणजे केवळ सुसज्ज व सुंदर दिसणारी इमारत नसून त्या ठाण्यात सर्वांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. पोलिसांच्या कामकाजात तत्परता निर्माण होण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुन्ह्याविषयक तपासासाठी लागणारी इत्थंभूत यंत्रणा मिळणे गरजेचे असते. ठाण्याच्या आवारात महिलांसाठी प्रसाधनगृह, मुद्देमाल रूम, तक्रारकर्त्यांसाठी प्रतिक्षालय, कॉमन रुम, सीसीटीव्ही, सीसीटीएनएस, पिण्याची पाण्याची सोय, वाहन पार्किंग, मोबाईल पेट्रोलिंग, प्रकाश व्यवस्था, मोबाईल अॅप सुविधा, वेळेवर पोहोचण्यासाठी रिस्पॉन्स टाईम, एम पासवर्ड, अशा विविध सुविधा या दोन्ही ठाण्याला पुरविल्या जाणार आहेत. यासंबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमार्फत प्राथमिक पाहणी करण्यात आली. या दोन्ही पोलीस ठाण्याला विविध सुविधा पुरवून स्मार्ट बनविण्याचे कार्य प्रगतीपथावर होत आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत फ्रेजरपुरा ठाण्यात अशाप्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या असून त्या ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता त्याचप्रमाणे नांदगावपेठ व बडनेरा पोलीस ठाणे स्मार्ट होण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले आहे. या स्मार्ट ठाण्यासाठी लागणारा सर्व खर्च शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यालयीन कामकाजाच्या निधीतून केला जात आहे. महिला ठाण्याचा प्रस्ताव प्रलंबितमहिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे तयार केले जाणार असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस विभागाकडून महिला पोलीस ठाण्यासंबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र, अद्याप पोलीस महासंचालक कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला स्मार्ट घोषित करण्यात आले. आता नांदगावपेठ व बडनेरा ठाणे विकसित केले जात आहे. या दोन्ही ठाण्यांत सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्यानंतर त्याला स्मार्ट ठाण्याचा दर्जा प्राप्त होईल. - प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त