माता-पित्याचा हृदयद्रावक विलाप : दिवसभर थांबले नाहीत गावकऱ्यांचे अश्रू, एकाही घरात पेटली नाही चूलसंजय जेवडे/मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरकाश्मिरच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वत:ची आहुती देऊन देशाचे रक्षण करणारा नांदगावच्या मातीतील ‘कोहीनूर’ हरपला. आमचा पंजाब गेला. पुत्रवियोगात आक्रोश करावा की देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या चिरंजीवाला गर्वाने ‘सॅल्यूट’ठोकावा, अशा संभ्रमात वीरमाता-पिता प्राण कंठाशी आणून त्याच्या पार्थिवाची प्रतीक्षा करताहेत. सांत्वनासाठी येणाऱ्यांच्या गळ्यात पडून वीरमाता क्षणात अश्रू ढाळते, तर क्षणात पुन्हा नि:शब्द होते. पित्याला तर काय करावे, तेच कळत नाही. शून्यात नजर लाऊन ते बसून आहेत. भावा-बहिणींचा आक्रोश पाहावत नाही. गावकरीही अबोल झालेत. आज सकाळी गावात पंजाब उईके शहीद झाल्याची बातमी धडकली आणि सारे गाव स्तब्ध झाले. हळूहळू पंजाब यांच्या घरापुढे गर्दी जमू लागली. तोवर झालेल्या घटनेपासून अनभिज्ञ असलेल्या कुटुंबीयांना काही तरी विपरीत घडल्याची कुणकुण लागली आणि मग पंजाबची आई बेबीतार्इंचा धीर सुटला. देशाच्या रक्षणासाठी ज्याला मोठ्या धाडसाने हसत-हसत रवाना केले, तो काळजाचा तुकडा देशाच्या रक्षणासाठी वीरगतीस प्राप्त झाला, हे कळताच त्या माऊलीला धक्का बसला. क्षणभर ती नि:शब्द झाली. मग, डोळ्यांतून वाहणाऱ्या अविरत अश्रुधारा थांबेचनात. विकास..विकास...असा मुलाच्या नावाचा जप करीत ती माऊली अजूनही रडतेय. घरात विकासची बाळंतीण बहीण. अवघ्या १० ते १२ दिवसांपूर्वीच तिची प्रसूती झालेली. गावकऱ्यांच्या मनात धगधगतोय अंगारनांदगाव खंडेश्वर : प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या आपल्या लाडक्या बहिणीशी गत ६ सप्टेंबरलाच पंजाबने दूरध्वनीवरून संवाद साधला होता. तिची आस्थेने विचारपूस केली होती. प्रसूतीसाठी १० हजार रूपयेदेखील पाठविले होते. त्यानंतर तिला कन्यारत्न प्राप्ती झाली. भाचीला बघण्याची विकासची धडपड सुरू होती. पण, भाचीचे तोंड बघण्यापूर्वीच तो वीरगतीस प्राप्त झाला. त्याची बहिण भावासोबत झालेला शेवटचा संवाद आठवून हमसून हमसून रडते आहे. भावाचा तर आधारच गेलाय. मनात पाकिस्तानविरूद्ध धगधगणारा अंगार ज्येष्ठांनी कसाबसा थोपवलाय पण तरूण मात्र खदखदतोय..नारेबाजी करतोय...पाकिस्तानचे झेंडे जाळतोय...असे चित्र आहे शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या नांदगावातील. पाकिस्तानने भ्याड हल्ला करून या जवानांचा बळी घेतला. त्या पाकिस्तानला शासनाने धडा शिकवाच, अशी मागणी युवक करीत होते. गावकऱ्यांनी रेखाटल्या रस्तोरस्ती रांगोळ्यासोमवारी शहीद पंजाब उईके याचे पार्थिव बघण्यासाठी नांदगाववासी सकाळपासूनच प्रतीक्षेत होते. रस्त्यांवर गर्दी जमली होती. महिलांनी रस्तोरस्ती झाडून सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. वीरमरण प्राप्त करून देशासाठी आहुती देणाऱ्या आपल्या गावच्या सुपुत्राला ‘यादगार’निरोप देण्यासाठी अख्खा नांदगाव झटतोय. महसूल आणि पोलीस प्रशासनाची १५० जणांची चमू आज नांदगावात तैनात होती. सायंकाळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह, एसडीपीओए, एसपी, चौदा तालुक्यांचे ठाणेदार नांदगावात पोहोचले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता शहीद पंजाब उईकेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला पालकमंत्री राहणार उपस्थितजिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे मंगळवारी सकाळी मुंबईवरून येऊन सकाळी १०.४५ वाजता नांदगाव येथे शहीद विकास उईके याला श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वना करणार आहे.पित्याला झाले अनावर आभाळाएवढे दु:खजानराव उईके यांनी ३३ वर्षे सैन्यात राहून देशसेवा केलेली. त्यामुळे मृत्यूची सतत डोक्यावर असलेली टांगती तलवार त्यांना माहीत होती. तरीही त्यांनी निवृत्त झाल्यानंतर विकासला सैन्यात पाठविले. तरीही त्यांना तरण्याताठ्या पंजाबचा मृत्यू पचविणे सोपे गेले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव, डोळ्यांत राहून-राहून तरळणारे अश्रू पाहून ही बाब लक्षात येत होती. दिलदार मित्र गमावला !सुरूवातीला नांदगावातील जि.प.शाळा व त्यानंतर शिवाजी हायस्कूल येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पंजाब उईके यांनी घेतले. त्यांचे वर्गमित्र असलेले सचिन जोगदंडे व भूषण वैद्य सांगतात, अभ्यासात पंजाब सुरुवातीपासूनच हुषार. पहिल्या तीन मध्ये त्याचा क्रमांक ठरलेला. स्वभाव अतिशय विनम्र, कुणालाही पहिल्याच भेटीत जिंकून घेणारा. मित्रांच्या अडी-अडचणीला धावणारा. एकदा का एखाद्याशी त्याचा परिचय झाला की ती व्यक्ती पंजाबला विसरणे केवळ अशक्यच. सैन्यात नोकरी लागूनही गर्व त्याला शिवला नव्हता. सुट्यांमध्ये गावी आल्यानंतर तो मित्रांसोबत धम्माल करायचा. त्याच्या भाचीच्या जन्मानंतर त्याला व्हॉट्सअॅपवर पाठविलेले फोटोग्राफ्स जम्मू काश्मिरमध्ये तो तैनात असलेल्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने त्याला बघताही आले नाहीत, हे सांगताना सचिन जोगदंडे यांचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्या या दिलदार मित्राने देशासाठी शौर्य गाजवून नांदगावचे नाव अजरामर केल्याचा अभिमानही या मित्रद्वयांच्या बोलण्यातून झळकत होता.
नांदगावच्या मातीतील ‘कोहीनूर’ हरपला!
By admin | Published: September 20, 2016 12:08 AM