अमरावती - रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात काचीगुडा एक्स्प्रेस बंद होती, पण, नंतर सुरू झाली. दरम्यान प्रवासी संख्येअभावी तात्पुरते बंद करण्यात आली होती. आता काचीगुडा- नरखेड-काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून नव्याने सुरू होत आहे.
नरखेड, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, रिद्धपूर,मोवाड, पुसला, बेनोडा, पाळा, हिवरखेड, आष्टेगाव, कोळविहीर, शिराळा, वलगाव आदी भागांतील शेतीमाल, धान्याची ने-आण दिल्ली, मुंबई, हावडा या प्रमुख शहरात करण्याच्या उद्देशाने नरखेड रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आला. याच मार्गावरून अन्य रेल्वे गाड्या, मालवाहू गाड्या धावतात. मात्र, कोरोनाकाळात नरखेड रेल्वे मार्ग निर्मनुष्य झाला होता. या मार्गावरील रेल्वे स्थानके ओस पडली होती. परंतु, आता मध्य रेल्वे भुसावळ विभागाने नरखेड मार्गवरील काचीगुडा एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काचीगुडा- नरखेड (गाडी क्रमांक ०७६४१) ही गाडी १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७६४२) ही गाडी १५ जानेवारी रोजी नरखेड येथून धावणार आहे. या गाडीत आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती- मुंबई २२ पासून सुरु होण्याचे संकेत
मार्चपासून बंद असलेली अमरावती- मुंबई एक्स्प्रेस २२ जानेवारीपासून सुरू करण्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. मुंबई एक्स्प्रेसचे डबे, वॉशिंग, कर्मचारी, चालक आदींबाबतची माहिती वरिष्ठांनी मागविली आहे. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या मागणीनुसार खा. नवनीत राणा यांनी रेल्वे बोर्डाला मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. ही गाडी सुरू झाल्यास मुंबईला ये-जा करणे सोयीचे होणार आहे.