दर्यापूर : येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलने झालीत, चर्चा झाली. पण, हा प्रश्न २८ वर्षांत का निकाली निघाला नाही, असा प्रश्न दर्यापूरकरांना पडला आहे. इतक्या वर्षात तब्बल ३० ते ३५ निष्पाप लोकांचे या पुलाखाली डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यासंदर्भातला प्रश्न माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंंतु नगर पालिका नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या राजकारणातच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा पूल व्हावा, यासाठी महाराष्ट ्रनवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील वाकोडे यांनी अनेकवेळा आंदोलनही केले. तसेच विविध पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पुलासाठी प्रयत्न केलेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे येथे बळी जातच राहिले. पूलाची उंची कमी असल्यामुळे येथे भला मोठा डोह तयार झाला आहे. गणेश विसर्जनादरम्यान किंवा पुलावरुन पाणी सुुरु असताना पाय घसरुन अनेकांचे येथे प्राण गेले आहेत. येथे अंदाजे १०० ते २०० फूट खोल डोह असावा, असा अंदाज आहे. परंतु प्रशासनाने कधीही गाळउपसा केला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष गहरवाल यांच्या काळात नगरपालिकेने पुलाची निर्मिती केली होती. पुलावरुन पाणी वाहात असताना ये-जा करु नये, असे फलकही येथे लावण्यात आले होते. परंतु बाभळी व बनोस्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने नागरिक पुलावरुन वाहत असतानाही ये-जा करतात.
नदीवरच्या संकीर्ण पुलाने घेतले ३५ बळी
By admin | Published: November 26, 2015 12:15 AM