पंकज लायदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग लघुचित्रपट महोत्सव २०२० स्पर्धेत महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजविले. विजेते चित्रपट मानवी हक्कांचे होत असलेले हनन आणि सामाजिक उपेक्षा यांवर प्रकाश टाकतात. आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या माहिती पत्रकात अत्यंत मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारात दोन लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार रवींद्र माणिक जाधव यांच्या ‘थलसार बंगसार’ या कोकणी लघुपटाला देण्यात आला, तर दीड लक्ष रुपयांचे सामायिक द्वितीय पारितोषिक डॉ. नितीन वसंतराव गणोरकर यांच्या ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ आणि थोमास जाकोब यांच्या ‘अन्नाम’ या मल्याळी लघुचित्रपटाला बहाल करण्यात आला. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सहाव्या लघुचित्रपट महोत्सवात संपूर्ण भारतातून ९३ स्पर्धकांची नोंद झाली.
‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ हा माहिती चित्रपट निसर्गाशी वंशागत जुळून असलेल्या मेळघाटमधील आदिवासी समुदायाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापनानंतर किती सामाजिक आणि प्रशासनिक समस्यांशी झुंजतो, हे या माहितीपटात मुख्यतः चित्रित केलेले आहे. ९ मिनिट ५४ सेकंदाची लांबी असलेला हा माहितीपट महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायद्यातील तरतुदींच्या प्रशासनिक उल्लंघनावर प्रखरपणे प्रकाश टाकतो.
व्याघ्र संवर्धन प्रकल्पबाधित मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या उपेक्षा आणि विवंचना, शासन यंत्रणेकडून होत असलेला प्रचंड मनस्तापाचा उलगडा चुर्णी, वैराट आणि पस्तलाई गावच्या पुनर्वसित प्रकल्पबाधितांनी केला. सन २००१-०२ पासून ते २०१८ पर्यंत बोरी, कोहा, कुंड, चुर्णी, वैराट, अमोना, नागरतास, बरुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपानी, डोलार आणि पस्तलई या आदिवासी गावांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. प्रकल्पबाधितांना मूलभूत सोई-सुविधांपासून शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे, असे पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ सांगतात.
‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण आणि संपादन ऋषीकेश खंबायत यांनी केले. मूर्त रूप साकारण्यासाठी डॉ. निशा केमसे-कांबळे यांनी उत्पाद नेपथ्य विभाग सांभाळला. प्रा. स्वप्निल कांबळे यांचे सहदिग्दर्शन करून मोलाचे मार्गदर्शक योगदान राहिले. ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य फर्ग्युसन कॉलेज (पुणे), टाटा सामाजिक विज्ञान (मुंबई), अमरावती जिल्हाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभाग कर्मचारी आणि अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाचे सहकार्य लाभले. माहितीपटाला निर्मिती अर्थसाहाय्य शिल्पा शिवणकर-कांबळे, ऋषीकेश कीर्तीकर, डॉ. संदीप राऊत, अनिरुद्ध राऊत, ज्ञानेश्वर बांगर, जय प्रकाश, गौतम पाटील, उत्तम साहू, रोहिणी शिवकुमार, नेहा राय, अजित कुमार पंकज, दीप चंद यांनी केले तसेच आशिष तरार, श्रेयस पन्नासे, शंतनु पुंड, राहुल तऱ्हेकर, साक्षी आंबेकर, रोहिणी बुंदेले, माधुरी गणोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.