अमरावती : जिल्ह्यातील विविध गावागावात राष्ट्रीय पोषण महा अभियानात वेगवेगळे उपक्रम राबवून केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपक्रम अपलोड केले. यामध्ये अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुरूवारी पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांचा गौरव करण्यात आला.
गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात येतो. यावेळी कुपोषण कमी करणे माता आणि बालकांचे आरोग्य तपासणी, स्वस्त बालक, बालिका स्पर्धा त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम राबवतात राबविले जातात. यावेळी जिल्ह्यात केंद्र शासनाचे उपक्रमाबरोबरच वृद्धांचे वाढदिवस, कर्तबगार मुलींचा सन्मान, लोकप्रतिनिधींचा सन्मान, पाककृती स्पर्धा,यासारखे अनेक उपक्रम राबविले आणि ते केंद्र शासनाची वेबसाईटवर अपलोड केले. यावर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राज्यस्तरीय चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र, जिल्हाधिकारी यांची मुलाखत, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई यांची मुलाखत, आॅक्सफर्ड विद्यापीठ लंडनचे प्रोफेसर जाक यांची तिवसा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना भेटी, यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम झेडपी महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी स्वत: पुढाकार घेवून राबविले. यामुळे जिल्ह्यांचा डंका राज्यातच नव्हे तर देशभर गाजला.
या उपक्रमाबद्दल प्रतिनिधी स्वरूपात मोझरी येथील अंगणवाडी सेविका मेघा बनारसे आणि वरुड येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी साधना पांडे यांचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. या यशनंतर १२ आॅक़्टोंबर रोजी या उपक्रमाचा समारोप महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, कॅफो चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, सेवानिवृत्त अभियंता संदीप देशमुख,तसेच सर्व अंगणवाडी सेविक, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी सेविकांनी महिनाभर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सौरव कटीयार यांनी प्रशंसा केली.