भंगार व्यावसायिकही झाला टेक्नोसॅव्ही: रूपडे पालटले
परतवाडा : कोरोनाकाळात काही व्यवसायांचे स्वरूप बदलत चालले आहे. हातकटला वा रिक्षाकटला व एक तराजू घेऊन घरांपुढे येणारा भंगारवाला आता ऑटोरिक्षारूपी स्वयंचलित कटल्यात भंगार खरेदी करू लागला आहे. त्यावरील साऊंड सिस्टीममध्ये स्वच्छ भारत मिशनच्या धर्तीवर ‘आला आला भंगारवाला, भंगार आणा, पैसे घेऊन जा’ असा सतत उद्घोष सुरू असतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतून सुरू राहणारा हा उद्घोष लक्षवेधक ठरला आहे.
भंगार खरेदी करण्याचा लक्षवेधक प्रयत्न अचलपूर शहरातील शेख अफजल या युवकाने चालविला आहे. त्याकरिता त्याने एमएच २९ एएन ०५५२ क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा एक जुना ऑटोकटला विकत घेतला. त्यावर त्याने साऊंड सिस्टीमही बसविली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रात तो घरोघरी जाऊन भंगार खरेदी करतो. या खरेदीतला त्याचा आत्मविश्वासही दांडगा आहे.
भंगार खरेदीचे बदलते स्वरूप लक्षवेधक ठरले असले तरी परंपरागत हातकटला आणि सायकलवरून भंगार खरेदी करणारेही या कोरोनाकाळात भंगार खरेदीचा व्यवसाय जपून आहेत. दिवसभर शहरात भटकंती करून मिळणाऱ्या दोनशे-अडीचशे रुपयांच्या मजुरीतून ते कुटुंबाला हातभार लावतात.
खरेदी केलेला माल जालन्याला
कासदपुरा येथील शेख कलीम यांच्या माहितीनुसार, अचलपूर शहरातील सुमारे ३५ जण परतवाड्यात भंगार खरेदीचा व्यवसाय करतात. शहरातील ठोक भंगार खरेदीदार सात व्यापारी आहेत. ते लोखंड जालन्याला पाठवितात, तर प्लास्टिक नागपूरला रवाना केले जाते. रद्दी शहरातच विकली जाते.