अपघाताला जबाबदार कोण? नागरिकांचा प्रश्न, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील वर्दळीच्या वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्याला डबक्यांचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्याकडे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
वाठोडा ते म्हैसपूर या मार्गावरील सोनारखेडा, भालसी, ढंगारखेडा, वाकी या मार्गावरील वाहने ये-जा करतात. त्यामुळे हा मार्ग वर्दळीचा असून चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. परंतु, या एका वर्षात या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तरीही जाग आली नाही. प्रशासन या मार्गावर मोठ्या अपघाताची वाट तर बघत नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावरून संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या मार्गावर अनेक जिवघेणे खड्डे आजही कायम आहेत. अखेर खड्डे बुजविण्याला मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.