अमरावती : बडनेरा मार्गालगतच्या नवाथे येथील मल्टिप्लेक्स संकुल निर्मिती, कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती आणि वाहनचालक निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासन राबवीत नसल्याने सत्तापक्ष भाजपात मोठी नाराजी उमटत आहे. सभागृहात ठराव मंजूर झाल्यानंतरही प्रशासन काहीच हालचाली करीत नसल्याचे चित्र आहे.
पुढील वर्षी महापालिका निवडणुका होणार आहेत. गत पाच वर्षात सत्तापक्ष भाजपने शहरासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प साकारल्याची ब्ल्यू प्रिन्ट तयार करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. मात्र, गत काही महिन्यांपासून प्रशासन सत्तापक्षाला जुमानत नसल्याचे वास्तव आहे. ऑगस्ट महिन्याच्या आमसभेत नवाथे मल्टिप्लेक्स संकुलासाठी एजन्सी नेमण्याचा निर्णय झाला. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, निविदा उघडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कोणती एजन्सी निश्चित होणार, हे गुलदस्त्यात आहे. तसेच कंत्राटी अभियंते नियुक्तीचा प्रश्नही ऐरणीवर आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून निविदा काढण्यात आली नाही. कंत्राटी वाहनचालकांची निविदा अनेकदा सांगूनही निघत नसल्याने भाजपचे पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे. आमसभा, स्थायी समितीत निर्णय होऊनही प्रशासन ढिम्म वागत असेल तर सामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या प्रशासन खरेच साेडविते का? हा संशोधनाचा विषय आहे.