नवे वळण : भंडारी चौकशीच्या कक्षेत लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नाहरकत प्रमाणपत्राच्या मूळ दस्तऐवजावर हुक्का पार्लरसह चार पार्लर्सची बनावट नोंद घेण्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या घनशाम भंडारीने तो घनशाम नसून नवीनचंद्र भंडारी असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. घनशाम या लहान भावाच्या नावाचा गैरवापर करीत नवीनचंद्र भंडारीने ही बनवेगिरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. १२ चा प्रकार १६ ला उघड अमरावती : घनशाम भंडारी म्हणून अटक केलेल्या व्यक्तीने आपण नवीनचंद्र भंडारी आहोत, असा दावा केला असून त्या पुष्ट्यर्थ आधार कार्डही पोलिसांना दाखविले आहे. घनशाम भंडारी हा आपला भाऊ असून त्याने आपल्या नावे ‘पॉवर आॅफ अॅटर्नी’ केल्याने आपण घनशाम भंडारी म्हणून महापालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविल्याचे नवीनचंद्र भंडारीने पोलीस चौकशीदरम्यान सांगितले आहे. महापालिकेतील कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी यांच्या तक्रारीनुसार शहर कोतवाली पोलिसांनी १७ मे रोजी घनशाम भंडारी व अमित दुबे या दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून घनशाम भंडारीचेच नाव नमुद आहे. तर न्यायालयातही त्याला घनशाम भंडारी म्हणूनच उपस्थित करण्यात आले. घनशाम भंडारीला २० मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. कोठडीदरम्यान त्याने आपण घनशाम भंडारी नसून नवीनचंद्र भंडारी असल्याचा दावा केल्याने पोलिसांची तपासाची दिशाच बदलली आहे. नाव बदलून शासकीय दस्तऐवजांसाठी दिलेल्या अर्जावरही नवीनचंद्र याने घनशाम भंडारी अशीच स्वाक्षरी केली आहे. पोलीस सूत्रानुसार आरोपी नवीनचंद्रने ज्या घनशामच्या नावाचा वापर केला. तो घनशाम भंडारी परभणी येथे राहात असून तेथे व्हिडीओ पार्लरचा व्यवसाय करीत असल्याची बाब तपासात उघड झाली आहे. या अनुषंगाने नवीनचंद्र भंडारीचा भाऊ घनशाम भंडारीला चौकशीसाठी बोलविण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिकेत उद्योगासाठी नाहरकत प्रमाणपत्राचा अर्ज देताना नवीनचंद्रने तो अर्ज घनशाम भंडारीच्या नावाने दिला. स्वत:ची ओळखही घनशाम भंडारी म्हणूनच करून दिली आणि त्यावर घनशाम भंडारी म्हणून स्वाक्षरीही केली. हुक्का पार्लरला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देणार नाही, असा पवित्रा महापालिका यंत्रणेने घेतल्याने नवीनचंद्रने भावाच्या नावावर ही तोतयेगिरी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्वत:ची ओळख लपवून भावाच्या नावे बेकायदेशिर कृत्य केल्याप्रकरणी नवीनचंद्रविरूद्ध अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांनी दिली. महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सहायक संचालक कार्यालयात १२ मे रोजी हा प्रकार घडला. मात्र, १६ मे रोजी या प्रकाराचे बिंग फुटले. दिलीप फुलाडी हे या ठकबाजीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. तथापि पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र लिहून हुक्का पार्लरच्या परवान्याबाबत विचारणा केली. त्या पत्राचे उत्तर देण्यासाठी सहायक संचालक कांबळे यांनी अधिनस्थ अभियंता व फुलाडी यांना विचारणा केली. त्यावेळी फुलाडी यांनी १२ मे रोजी भंडारीला दिलेले नाहरकत प्रमाणपत्र कांबळे यांना दाखविले. ते पाहून कांबळे अवाक झाले. त्यांनी फुलाडीला याप्रकाराची विचारणा केली. त्यानंतर उपअभियंता दीपक खडेकार यांनी सामान्य प्रशासन विभागात जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दुबे आणि भंडारीची ठकबाजी बंदिस्त झाली होती. अशाप्रकारे या ठकबाजीचे बिंग फुटले. असा घडला होता प्रकार घनशाम भंडारीच्या नावाचा गैरवापर करत नवीनचंद भंडारी याने १२ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एडीटीपी विभागातून मनोरंजनासाठी एनओसी मिळविली. त्याच कालावधीत कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी काही कामानिमित्त कार्यालयाबाहेर पडले. त्याचवेळी आरोपी अमित दुबेने फुलाडी यांच्या कपाटातील फाईल बाहेर काढून त्यातील एनओसीची मूळ प्रत नवीनचंद्रला दिली. त्यात नवीनचंद्रने हुक्का पार्लर, कार्ड रुम, व्हिडिओ गेम व पूल असे स्वहस्ताक्षरात लिहिले व दोन्ही आरोपी महापालिकेच्या बाहेर पडले.
नवीनचंद्रची बनवेगिरी
By admin | Published: May 20, 2017 12:32 AM