अमरावती - जिल्ह्यातील ठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीच्या पुलाजवळील घाटावर गुरुवारी गौरखेड्याचे चार जण वाहून गेले. घटनेतील मृत संतोष वानखडेवर शुक्रवारी सायंकाळी, सागर शेंदूरकरवर शनिवारी दुपारी, तर ऋषीकेश वानखडे याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी, कुटुंबातील मातांनी फोडलेला हंबरडा पाहून नवनीत कौर यांनाही अश्रू अनावर झाले.
गौरखेडा येथील वीर शिवाजी तरुण उत्साही सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत संतोष बारकाजी वानखडे, सागर शेंदुलकर, कृषिकेश वानखडे, सतीश सोळंके यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या चौघांच्या मृतदेहाच्या शोधमोहीमवेळीही खासदार नवनीत राणा स्वतः उपस्थित होत्या. त्यावेळी शोधमोहिम करणाऱ्या पथकाशीही त्यांनी सातत्यपूर्ण संपर्क ठेवला. त्यानंतर, मंगळवारी आमदार रमेश बुंदीले यांचे समवेत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, प्रत्येक कुटुंबीयांस 4 लाख रुपयांचा निधीही मदत म्हणून दिला. मात्र, पीडित कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर घालताना, डोळ्यादेखत मुले गमावणाऱ्या आईंच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी, नवनीत कौर यांच्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
गौरखेडा येथील वीर शिवाजी तरुण उत्साही सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता अनेक तरुण गुरुवारी 3 वाजता निघाले. आधी खल्लार येथील चंद्रभागा नदीच्या पुलाजवळ गणेश विसर्जन करण्याचे ठरले. मात्र, पॉवर हाऊसजवळ आले असताना काही कार्यकर्त्यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात गणेशमूर्ती विसर्जन करू, असे म्हटल्याने ट्रॅक्टर शुक्लेश्वर घाटाकडे वळविण्यात आला. ऋषीकेश व सतीश या दोघांच्या आई ट्रॅक्टरमध्ये होत्या. मृत संतोष वानखडे यांचा सातव्या वर्गात शिकणारा मुलगा यश व त्याची बहीण रोहिणी हेसुद्धा ट्रॅक्टरमध्ये होते. कार्यकर्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना संतोष वानखडे हे घरी होते. त्यांची विसर्जनाला जाण्याची इच्छा नव्हती; परंतु मुलांच्या काळजीने ते गेले. पुलावरून विसर्जन करायचे की घाटावरून, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना करून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही.
शुक्लेश्वर घाटावर गणेश विसर्जनासाठी पोहोचलेल्या ऋषीकेश वानखडे व सतीश सोळंके यांच्यासह दोघांच्या आईही सोबत होत्या. पोटची मुले डोळ्यांदेखत नदीत वाहून जाण्याचा वेदनादायी प्रसंग या माउलींनी अनुभवला. संतोष वानखडे यांचा मुलगा व मुलगीही शुक्लेश्वर घाटस्थळी उपस्थित होते. पिता वाहून जात असल्याचे पाहून तेही कोलमडले.