अमरावती : विदर्भात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आगामी अमरावतीलोकसभा मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार देण्यात यावा, असा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा आग्रह राहिल. सध्या विद्यमान खासदार नवनीत राणा या देखील आमच्या एनडीएचा घटक आहेत. त्यामुळे त्यांनी अमरावती लोकसभेची निवडणूक ‘कमळ‘वर लढवावी, असा आमचा प्रयत्न राहिल. शेवटी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी अमरावती लोकसभेच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सकाळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना अमरावती लोकसभा निवडणुकीवर फोकस केला. देशवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपकडे अमरावती लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहे. मात्र, खासदार नवनीत राणा या एनडीएच्या घटक पक्ष असल्यामुळे त्यांनी भाजपच्या कमळवर निवडणूक लढविल्यास राणांसाठी ती आणखी सुकर होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, तुषार भारतीय आदी उपस्थित होते.