लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नवनीत राणांनी पत्रकाराला उत्तर दिले नाही, तर त्या मिश्कीलपणे बोलल्या, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यात एवढे सीरिअस नाही, असे सांगून त्यामुळे काहीतरी समज-गैरसमज तयार होत असल्याचे मात्र ते म्हणाले. मला असे वाटते की, बच्चू कडूंबाबत बोलत असताना चुकीचा रेफरन्स आला आहे, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला. ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये,’ असे वक्तव्य राणा यांनी बावनकुळे यांना उद्देशून केले होते. त्यावर बावनकुळे यांना छेडले असता, त्यांनी आपली व त्यांची भूमिका वेगळी नसल्याचे सांगितले.
‘बघा, बघा, दुसरा उमेदवारच मिळाला नाहीतिकिटासाठी युवा स्वाभिमान सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या राणा यांचे ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये’ हे वक्तव्य विरोधकांच्या प्रचाराचा, टीकेचा मुद्दा ठरला आहे. आपण किती लाचारी स्वीकारावी, असा खडा सवाल ‘प्रहार’चे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजपला केला आहे. आ. यशोमती ठाकूर यांनी ‘आम्ही अनुभवले, आता भाजपची पाळी,’ म्हणून स्थानिक भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. राणांचे ते वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. ते वक्तव्य स्वकीयांना पचविणे जड झाले असताना दुसरीकडे विरोधक व रिंगणातील प्रतिस्पर्ध्यांकडून ते ‘इनकॅश’ करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ‘बघा, बघा, भाजपला दुसरा उमेदवारच मिळाला नाही. युवा स्वाभिमानमधून आयात केलेला उमेदवार केवळ तिघांना नेता मानतो, तर बाकीच्यांना काय?’ असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.