अमरावती - मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींच्या घोटाळ्यात ९१ हजार खातेदारांची शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी फसवणूक केली. याप्रकरणी या दोघांचेही बँक खाते सील करावे, घोटाळ्याची चौकशी व कारवाईची मागणी खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी (25 जुलै) केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे लोकसभेतील चर्चेदरम्यान केली आहे.
बोगस कंपनीची नोंदणी करून व चिटफंडाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लोकसभेत गुरुवारी विधेयक मांडण्यात आले. गोरगरिबांचा पैसा सुरक्षित राहावा, यासाठी खासदार नवनीत रवि राणा यांनी या विधेयकाचे समर्थन केले. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी सभापतींच्या माध्यमातून या मागणीसाठी केंद्रीय वित्तमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुंबईत सिटी बँकेच्या १० शाखा व सर्वसामान्य, श्रमजीवी वर्गातील ९१ हजार खातेदार आहेत. या बँकेत बोगस कर्जाच्या माध्यमातून ९०० कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे बँकेचे दिवाळे निघाले, तेव्हा अध्यक्ष आनंदराव विठोबा अडसूळ यांनी एका खातेदाराला सहा महिन्यांत फक्त एक हजाराची रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले. ही खातेदारांसाठी धक्कादायक बाब आहे. याचा धसका घेतल्याने पाच ते सहा खातेदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला.
श्रमजीवी वर्गातील खातेदारांनी मुला-मुलींचे लग्न, शिक्षण यासाठी ही गुंतवणूक केली होती. या बँकेत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रपतींच्या सचिवांनीदेखील कारवाईचे पत्र दिले आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली.
असा झाला घोटाळा
शिवसेना नेते व माजी खासदार अध्यक्ष असलेल्या सिटी बँकेत ५० लाखांच्या मालमत्तेचे मूल्यांकन तीन कोटींवर दाखविण्यात आले व त्यांना २० ते ३० टक्के कमिशनवर दोन कोटींचे कर्ज देण्यात आले. अध्यक्षांच्या या कमिशनखोरीमुळेच सिटी बँंकेचे दिवाळे निघाल्याचा घणाघाती आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान केला. त्यामुळे अडसूळ व त्यांच्या पीए भालेराव यांची खाती सील करण्याची मागणी त्यांनी वित्तमंत्र्यांकडे केली.