अमरावती - खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण मुद्द्यावरुन शिवसेनेविरुद्ध आंदोलन पुकारले होते. मुंबईती मातोश्री या निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. त्यावेळी, झालेल्या आंदोलनानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, शिवसेना विरुद्ध राणा असा वाद महाराष्ट्राने पाहिला. यादरम्यान, नवनीत राणांना १४ दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यामुळे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवरील त्यांचा राग कायम दिसून येतो. आता नवनीत राणा यांनी अमरावतीत हजारो महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण केलं.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राणा यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. विशेष म्हणजे, हनुमान चालीसा हाच त्यांच्या आंदोलनाचा मुद्दा होता. त्यामुळेच, राणा म्हटलं की हनुमान चालीसा असं समीकरणच महाराष्ट्रात बनलं आहे.
तत्कालीन सरकार हे महाराष्ट्रावरील संकट असून ते दूर झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपण हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली होती. मात्र, याप्रकरणात मला १४ दिवस तुरुंगात जावं लागलं. तेव्हाच, जिथे जिथे हनुमान व रामाला विरोध होईल तिथे मी डोक्याला कफन व भगवा बांधून उभी राहिल, असं विधान मी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीर आज हजारो महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण केलं आहे, असे खासदार राणा यांनी म्हटलं. दरम्यान, अमरावती शहरातील हनुमान मंदिरात हजारो महिलांसमवेत नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचा पठण केलं. त्यामुळे, या सामूहिक हनुमान चालीसा पठणची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.