अमरावती/मुंबई - हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणचा हट्ट धरला होता. त्यामुळे, मुंबई आणि अमरावती येथील शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेरच गर्दी केली. राणा दाम्पत्यास खार येथील निवासस्थानातून बाहेरच पडू दिले नाही. दुसरीकडे अमरावती येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. आता, येथील एक व्हिडिओ समोर आला आहे.
आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते. राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचवेळी, पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात झटापट झाली होती. या गोंधळात एका शिवसैनिकाने राणा यांच्या अमरावतील घरावर दगडफेक केली होती. आता, या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील एका सीसीटीव्हीमध्ये हा शिवसैनिक कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी आपल्या घरावर दगडफेक झाल्याचा आरोपही केला होता. मात्र, तेव्हा दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं.
मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिराकडे बोट दाखवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना प्रसाद देणारच, असा इशारा मातोश्रीबाहेरील महिला शिवसैनिकांनी दिला होता. त्यावरुन, चांगलंच तापलं होतं. अखेर राणा दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसैनिक शांत झाले होते. मात्र, अटकेनंतर नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ
ठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
२९ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं.