अमरावती/मुंबई - शिवेसना विरुद्ध राणा हा वाद नवा नाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राणा दाम्पत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जबरी टीका केली. या दरम्यान, त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचं आंदोलन छेडलं होतं, त्यावरुन त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, आता राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर पुन्हा एकदा राणा दाम्पत्य शिवसेनाल लक्ष्य करत आहेत. नवनीत राणा यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या होत असलेल्या युतीवरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच, उद्धव ठाकरे हे घरी बसून अशी समीकरणे बनवण्याचंच काम करतात, असेही त्यांनी म्हटलं.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबडेकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अनेक दिवसांच्या या चर्चेनंतर नुकतेच एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर येऊन संभाव्य युतीचे संकेत दिले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही युतीसाठी तयार आहोत याचा निर्णय ठाकरेंच्या सेनेने घ्यावा असं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे, आता ही युती होणार असल्याची चर्चा असून सत्ताधारी भाजपने यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं.
उद्धव ठाकरे व वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांची युती होणार आहे, यासंदर्भात बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे हे कोणासोबतही गेले तरी महाराष्ट्राची जनता काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहते. उद्धव ठाकरे हे फक्त घरी बसून या समीकरणासाठी काम करतात, असा टोलाही त्यांनी वंचित-शिवसेना युतीवरुन उद्धव ठाकरेंना लगावला.
काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच (Prakash Ambedkar) काय ओवेसी (Owaisi) यांच्याशीसुद्धा युती करू शकतात. पण, त्यांनी तसं जरी केलं आणि आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजपा युतीच जिंकेल, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असेही ते म्हणाले.