अमरावती - किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. याच दरम्यान आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Ravi Rana) यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. किराणा दुकानातील वाईन विक्रीमुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
"वाईनचा निर्णय जर या सरकारने मागे घेतला नाही तर मी सुद्धा, वेळ पडली तर अण्णा हजारे यांच्यासोबत उपोषणात सहभागी होईन" असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला होता. आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करणार आहेत. राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे.
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक तसेच विक्रेत्यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काय म्हटलं आहे पत्रात
या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्चर्यकारक आहे.