सूरज दाहाट
अमरावती : राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार राज्यभरातील मंदिरंनवरात्रीच्या (Navratri) शुभ मुहुर्तावर आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र, विदर्भातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे कौंडण्यपूर (ता. तिवसा) येथील रुक्मिणी मातेचे मंदिर अद्याप बंदच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याबाबत तयारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी नियम-अटींनुसार जिल्ह्यातील मंदिरांची दारे उघडण्यासंदर्भात पत्रक काढले आहे. तथापि, प्रशासन व मंदिर समितीच्या उदासीन धोरणामुळे रुक्मिणीमातेचे मंदिर बंद आहे. शनिवारी तालुका प्रशासन कौंडण्यपूरचे हे मंदिर उघडण्याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे आणखी दोन दिवस भक्तांना रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे.
पंढरपूर येथील आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यात विदर्भातील एकमेव पालखी कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी होय. हे मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
मंदिर परिसरात भाविकांची गर्दी
कौंडण्यपूर येथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविक गुरुवारी सकाळी माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले. मात्र, मंदिराची दारे बंद असल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. मंदिर समिती व तालुका प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे, मंदिर ट्रस्टसोबत चर्चा झाली आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या नाहीत. मंदिर ट्रस्टची तयारी अपुरी आहे. लवकरच या ठिकाणी पूर्णपणे तयारी करून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात येईल.
- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा
भाविकांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. मंदिर उघडण्याबाबत उशिरा आदेश मिळाला. आता नवरात्र असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी येथे सुविधा करून शनिवारी सकाळपासून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात येईल.
- अतुल ठाकरे, विश्वस्त, रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर