पशुपालक त्रस्त : झेडपी सदस्यांचे लक्षवेधी आंदोलन
अमरावती : तिवसा तालुक्यातील मोझरी येथे जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या पशुसंवर्धन दवाखान्याच्या इमारत बांधकामाला सुरुवात केली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागासमाेर सदस्य गौरी देशमुख यांनी दवाखाना इमारत बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी नवसाचे पाच नारळ फोडून प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा संताप व्यक्त केला.
मोझरी येथे झेडपी पशुसंवर्धन विभागाचा श्रेणी २ दवाखाना आहे. तेथे नवीन इमारतीसाठी सदस्या गौरी देशमुख यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार अध्यक्षांनी निधी मंजूर केला. बांधकाम विभागाने इमारत बांधकामाला १३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. संबंधित कंत्राटदाराला ३० एप्रिल २०२० ते २९ जानेवारी २०२१ पर्यंत इमारत बांधकामाकरिता कालावधीसुध्दा दिला. परंतु अद्याप बांधकाम सुरू न केल्याने काम सुरू करण्यासाठी बांधकाम विभागासमारे नारळ फोडून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. यावेळी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, सुरेंद्र भिवगडे, योगेश भुसारी, प्रवीण राहाटे, मनोज लांजेवार आदी उपस्थित होते.