अमरावती : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ ही वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा अनिवार्य
असते. त्याअनुषंगाने रविवारी अमरावती शहरातील २३ केंद्रावर शिस्त आणि नियमात ‘नीट’ परीक्षा पार पडली. सॅनिटायझर, आधार कार्ड, मॉस्क याशिवाय विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तू, साहित्य परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई होती. एकूण ८११२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
रविवारी दुपारी २ ते ५ वाजता यादरम्यान ‘नीट’ परीक्षा नियोजितपणे घेण्यात आली. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा संचालनालयाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. नीट परीक्षेसाठी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य सुरेश लकडे यांच्याकडे जबाबदारी होती. यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यातील ८४०१ पैकी ८११२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे, ही परीक्षा अतिशय सोपी होती. नक्कीच उत्तीर्ण होऊन वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवेल, असा आशावाद तेल्हारा येथील विद्यार्थी ऋषिकेश खरोडे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला. परीक्षांचे नियोजन कसे असावे तर ‘नीट’ हे उदाहरण अनेक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमाेर ठेवूनच करिअरची वाटचाल करावी, असे अमेय पेठकर हा विद्यार्थी म्हणाला. विद्यार्थी केंद्राच्या आतमध्ये
असताना त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना तब्बल ४ ते ५ तास केंद्राबाहेर प्रतीक्षा करावी लागली. जणू
पालकांचीही परीक्षा झाली, असे चित्र अनुभवता आले, हे विशेष.