पालकमंत्री पोटे : ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांचा सहभागअमरावती : महाराष्ट्र शासनाने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून सुरू केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यातून निश्चितपणे वाचकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद कॉलनीतील श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात आयोजित या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ना.पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.आनंदराव अडसूळ, आ.अनिल बोंडे, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, प्रशांत वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रंथोत्सवानिमित्त २५ स्टॉल आले असून या स्टॉलची पाहणी त्यांनी केली. रिद्धपूर येथील महानुभाव पंथीय विविध प्रकाशनांची पाहणी केली. महानुभावपंथीय हस्तलिखिताचे जतन करण्यासाठी शासनाच्यावतीने पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. रिद्धपूर येथे मराठी भाषेचा उगम झाला. त्यामुळे रिद्धपूर येथील हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाईल असे यावेळी खा. अडसूळ यांनी यावेळी जाहीर केले. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सूर्यवंशी यांनी उपस्थित पाहुण्यांचे ग्रंथ देऊन स्वागत केले. समारंभाचे सूत्रसंचालन मंजूषा उताणे यांनी केले. सकाळी ९ ते १० या वेळेत जिल्हा ग्रंथालय कार्यालय ते स्वामी विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालय या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात आली. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी या ग्रंथदिंडीत भाग घेतला. (प्रतिनिधी)
ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृती जोपासण्याची गरज
By admin | Published: February 15, 2016 12:37 AM