रस्त्यांवर पसारा : महापालिका करणार का कारवाई ?अमरावती : महिना-दीड महिन्याच्या कालावधीत महापालिकेकडून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई न झाल्याने ठिकठिकाणी अतिक्रमणात बेसुमार वाढ झाली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याचे सबब दिले जात होते. मात्र आता मतमोजणीनंतर निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आल्याने हे पथक पुन्हा सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. थातूरमातूर कारवाई न करता आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी ‘टीम कुत्तरमारे’ला ‘व्यापक ड्राईव्ह’ घेण्याचे निर्देश द्यावे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे.महापालिकेच्या नाकावर टिच्चून ठिकठिकाणी थाटलेली अतिक्रमणे पाहता निर्मूलन पथक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. शहरभर झालेल्या अतिक्रमणाने ‘टिम कुत्तरमारे’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. शहराचा कुठलाही चौक आणि नागरी वस्ती अतिक्रमणापासून मुक्त नाही. शहराचा मध्यवर्ती भाग तर अतिक्रमणाने व्यापलेला असल्याने रस्ते अरूंद बनून सर्वसामान्यांचे जीणे धोक्यात आले आहे. वाहतुकीचा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. अतिक्रमणाला अभय देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केले जात आहे.शहरातील चित्रा चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, नागपुरीगेट, चांदणी चौक, पठाण चौक, व्हीएमव्ही, गाडगेनगर, पंचवटी, दस्तुरनगर, अंबागेट, अंबादेवी रोड, विलासनगर रोडवर इतवारा बाजार परिसराला अतिक्रमणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. व्यावसायिक संकुलापुढे हातगाड्यांचा वावर असून खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी तर शहरभर हैदोस घातला आहे. आ.सुनील देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्याने जवाहरगेट परकोटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा टांगापाडावपर्यंत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. इतवाराबाजार, गाडगेनगर रस्त्याने तर नीट चालणेही शक्य नाही, याकडे आयुक्त हेमंत पवार यांनी लक्ष देऊन तेथील अतिक्रमण हटविण्याबाबत ‘टीम कुत्तरमारेंना’ सूचना द्याव्या, अशी आग्रही मागणी होत आहे. (प्रतिनिधी)नवाथे, विश्रामगृहाजवळ वाहतुकीचा प्रश्ननवाथे चौकासह मालटेकडीलगतच्या विश्रामगृहाजवळ अनधिकृतपणे फुडझोन साकारला जातो. आरोग्य सुधारण्यास जाणाऱ्या नागरिकांच्याच आरोग्याशी खेळले जाते. वाहतुकीचा बट्ट्याबोळ केला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या नैतिकतेवर संशय घेतला जात आहे.ड्रिंक, फूड झोनवर कारवाई केव्हा ?उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील अनेक पदपथ ड्रिंक आणि फूड झोनमध्ये बदलले आहेत. परदेशी लस्सीवाल्यांनी शहरभर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असून मालटेकडी रस्ता त्यांनी व्यापला आहे. पंचवटीकडून गाडगेनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथ आणि बसस्थानकाकडून रुख्मिनीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमित हातगाड्या लागत असताना अतिक्रमण निर्मूलन पथक निद्रीस्त का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
अतिक्रमण निर्मूलनाच्या ‘ड्राईव्ह’ची निकड
By admin | Published: February 27, 2017 12:13 AM