उपोषणाचा तिसरा दिवस : समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी नाहीअमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्या, प्रश्न सोडविण्यासाठी मागील तीन दिवसांपासून येथील अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर गोधडी आंदोलनाच्या नावे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र, या आंदोलनाची दखल घेण्यासाठी एकाही अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी तीन दिवसांपासून थंडीत कुडकुडत आहेत.आदिवासी विकास विभागातंर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहाच्या इमारती बांधकाम तसेच युपीएससी, एमपीएससीच्या शिकवणी वर्गाचा कालावधी तीन वर्षांचा करण्याबाबत हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या बेमुदत आंदोलनामुळे जीवन फोपसे, संदीप तोरकड व प्रवीण पोतरे या विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळत आहे. आदिवासी विकास विभागाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. शासकीय इमारती नसताना भाड्याच्या इमारतीत कुठपर्यंत कारभार चालविणार, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. गोधडी आंदोलनात सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले असून या आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अथवा त्यांचे प्रतिनिधी येणार नाहीत, तोपर्यत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कृती समितीचे गणेश उघेड, शिवाजी तोरकड, सुरेश मुकाडे, राजू काळे, अनिल सुरत्ने, अर्जून पाद्रे, आकाश बेले, राणी पल्लव, सोनल आत्राम, चारु धुर्वे, प्रिती साकोम, आरती पवार, शुभांगी भलावी आदींनी घेतला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या गोधडी आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: December 31, 2015 12:18 AM