दोन तास चौकशी : पोलीस निरीक्षक ते शिपायापर्यंत सर्वांचीच चौकशीअमरावती : मागील १५ दिवसांपासून शहरात गाजत असलेल्या टीप व देशी कट्टा प्रकरणात शनिवारी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. आयुक्तांनी दोन तास बंदद्वार पोलीस निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांची चौकशी करून चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेर पडल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले होते. त्यामुळे आयुक्तांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. या दोन्ही प्रकरणाची सर्वंकष चौकशी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी स्वत:कडे घेतली आहे. ठोस पुरावे हाती आल्यानंतर जी कारवाई होईल, ती कारवाई आक्रमक आणि कठोर राहण्याची संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशैली चव्हाट्यावर आली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांना देशी कट्टा प्रकरणामध्ये आयुक्तांनी खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. ‘तो’ दावा फोलअमरावती : देशी कट्टाप्रकरणी जावेद नामक व्यक्ती पोलिसांचा पंटर असल्याचा दावा आत्राम यांनी केला आहे. नागपुरीगेटच्या ठाणेदारांनी जावेदला पसार घोषित करून शोध चालविला आहे. जावेद जर पंटर असेल तर तो पसार का या प्रश्नावर आत्राम निरुत्तर झाल्याचेही सांगण्यात आले. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता या चौकशीत कमालीची गोपनियता बाळगली जात असल्याचे दिसून आले.
पोलीस आयुक्तांकडून गुन्हे शाखा पोलिसांची कानउघाडणी
By admin | Published: November 29, 2015 12:48 AM