प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी
प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी :
किशोर मोकलकर
आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफीची घोषणा केली. त्यावेळी कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षे पूर्ण होत आली तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाचीही मदत आली नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.
कोरोनाच्या संकटसमयी शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर गारपीट, अतिवृष्टी, नापिकी अशी विविध संकटे समोर आलेली असतानाही या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत, घरातील दागिने विकून डोक्यावर कर्ज नको म्हणून बँकेची परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांची दखल शासन घ्यायला तयार नाही. आजही या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या कामाचे वाढविलेले दर यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.आगामी हंगाम पाहता, शेतकऱ्यांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी नियमित फेड करणाऱ्या कर्जदाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
------------ इंडियन बँकेच्या आसेगाव पूर्णा शाखेतून १५ ते २० वर्षांपासून मी पीक कर्जाची नियमित उचल व भरणा करीत आहे. शासनाने दोन वेगवेगळ्या योजनांतर्गत कर्जमाफी केली, तर कर्जाची प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार होते. मात्र, दोन वर्ष पूर्ण होत आले तरी अद्यापही माझ्या खात्यावर कोणत्याही योजनेतील कुठलीही रक्कम खात्यावर जमा झाली नाही. शासनाने कोरोना सारख्या महामारीत खचलेल्या शेतकऱ्यांना आता तरी मदत करावी.
अजय तायडे, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा
----------------- शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये दिले जाणार होते. मात्र, अद्यापही माझ्या खात्यावर ते जमा झालेले नाही. मी उलाढाल करून व दागदागिने गहाण ठेवून बँकेने दिलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड केली. मात्र, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्याला ठेंगा दाखविला.
- अंबादास पाटील, शेतकरी, आसेगाव पूर्णा