-------------------------------------------------------------------
कोविड नियमांचे करावे लागणार पालन : शेकडो गाइड, जिप्सी चालकांना रोजगार
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांशी संलग्न पर्यटनक्षेत्रातील लॉकडाऊन हटविण्यात आले आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारपासून हत्ती, जिप्सीने जंगल सफारी सुरू झाली आहे. यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सफारीदरम्यान कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.
व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी कोविड-१९ प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडील निर्देशांनुसार निसर्ग पर्यटन यापूर्वी बंद करण्यात आले होते. नव्याने सुधारित सुरू करण्यासंदर्भात आता आदेश प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्ली यांना राज्यात व्याघ्र प्रकल्पात पर्यटनास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. नवीन विषाणूचा प्रसार पाहता अंत्यत काटेकोरपणे दिशानिर्देशांचे पालन व स्थानिक अधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन पर्यटन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
बॉक्स
पर्यटकांची उपेक्षा संपली
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जिप्सी व हत्ती सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत होते. केंद्र शासनाने दिलेल्या आदेशामुळे आता त्यांना पावसाळ्यात हिरवीगार वनश्री, खळाळणाऱ्या नद्या, कोसळणारे धबधबे यांचा मनमुराद आनंद अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पात घेता येणार आहे.
बॉक्स
वन्यप्राण्यांचे अधिवास क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
राज्यातील सुधारित परिस्थिती पाहता, व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या संरक्षित क्षेत्रात निसर्ग पर्यटन सुरू करण्याबाबत तसेच बंदिस्त प्राण्यांच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत, याची खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्र ३० जूनपर्यंत पर्यटनासाठी खुले राहील. बफर क्षेत्रात दिनांक ३० जूननंतरही शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बफर क्षेत्रातील रस्ते खराब होणार नाहीत व संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेऊन खालील अटी व शर्तींचे पालन करून व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू राहणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी व्याघ्र प्रकल्पांना पाठविले आहे.
बॉक्स
या नियमांचे करावे लागणार पालन
१) पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक राहील.
२) पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तीला प्रवेश देतेवेळी सॅनिटायझर (कॉन्टॅक्टलेस) मशीनचा वापर करून सॅनिटायझेशन करण्यात यावे.
३) पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना मास्क लावणे आवश्यक राहणार आहे
कोट
जंगल सफारी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिल्याने शेकडो जिप्सी चालक व गाईड यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोरोनाकाळातील आर्थिक संकट कायम आहे, मात्र आता थोड्या मिळकतीची अपेक्षा आहे.
- भोला मावस्कर, गाईड, सेमाडोह
कोट
शासनाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच नियमांचे पालन करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कोलकास परिसरात हत्ती सफारी सुरू करण्यात येत आहे.
- कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा
-----------------
हजारावर पर्यटक, सफारीला ११ जिप्सी
चिखलदरा पर्यटन स्थळावर शुक्रवारी ११४० पर्यटकांची नोंद नगरपालिकेच्या पर्यटक नाक्यावर झाली होती. त्यापासून पालिकेला १३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारी ते चिखलदरा येथून वैराटसाठी, तर सेमाडोह येथून पिंपलपडाव, कुवापाटी परिसरासाठी सफारी आहे. वैराट सफारीत चाटीबल्डा, मिर्चीबल्डा, सांभरबल्डा, वैराट, हवाखांडी परिसरात शुक्रवारी सकाळी ११ च्या वेळेला दोन, तर दुपारी ३ च्या वेळेला नऊ अशा ११ जिप्सीतून ६० पेक्षा अधिक पर्यटक सफारीला गेले. दुसरीकडे सेमाडोह व कोलकास येथे शुक्रवारी दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांना वरिष्ठ कार्यालयातून आदेश आदेश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हत्ती सफारी व जंगल सफारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू केली जाणार आहे.