फोटो पी २८ वाघ दवाखाना
अनिल कडू
परतवाडा: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत परतवाडा येथे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणून वन्यजिवांचा दवाखाना उभारल्या गेला. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रतिष्ठानकडून तेथे चार महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी दिले गेले नाहीत. डॉक्टरअभावी हा वन्यजिवांचा दवाखाना बंद पडला. औषधोपचाराविना वन्यजिवांचे हाल होत आहेत.
दवाखान्यातील रॅपिड रेस्क्यू टीमसुद्धा काढून घेण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन सेवेपासून वन्यजीव वंचित आहेत. अनेक वन्यजिवांना प्राणास मुकावे लागत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन राज्य योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये ७० लाख ५६ हजार ९०० रुपये खर्च करून हे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर उभारले गेले. वन्यजिवांच्या औषधोपचाराची सुविधा कार्यान्वित केल्या गेली. वन्यजिवांसह पक्षांकरिता, वाघ, बिबट, अस्वलीकरिता स्वतंत्र व्यवस्थेसह स्पेशल वार्ड दिले गेले.
बॉक्स
रॅपिड रेस्क्यू टीम
मेळघाट व्याघ्र प्रतिष्ठानकडून पशुवैद्यकीय डॉक्टरांसह आवश्यक कर्मचारी नियुक्त केेले गेले. आवश्यक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर आणि औषधी पुरविल्या गेल्या. अडचणीतील वन्यजिवांना सोडविण्याकरिता रॅपिड रेस्क्यू टीम या ठिकाणी दिली गेली. आठवड्यातील सर्व दिवस २४ तास औषधोपचाराची व्यवस्था ठेवली गेली. याचा फायदा अनेक वन्यजिवांना झाला. जखमी वन्यजिवांवर या ठिकाणी औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचविले गेले. नंतर त्यांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात सोडले गेले. या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे व्यवस्थापन मेळघाट व्याघ्र प्रतिष्ठानकडे असून, सिपना वन्यजीव विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र कोरोनाकाळात हा वन्यजिवांचा दवाखाना बंद ठेवण्यात आला आहे.
डॉक्टरांची नियुक्ती करा
परतवाड्यातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरवर पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा. नियमित रेस्क्यू टीम तैनात ठेवावी, अशी मागणी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे केली आहे. जानेवारी २०२१ पासून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पशुवैद्यकीय अधिकारी आणि रेस्क्यू टीम उपलब्ध नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.