अमरावती: येथील इर्विन रेल्वेस्टेशन रोडवरील सबनिस यांच्या पडक्या वाड्यात आढळलेल्या मृतदेहाची लागलीच ओळख पटवून त्याची हत्या झाल्याची उकल करत अवघ्या १२ तासात पोलिसांनी भाच्याच्या मारेकरी मामास अटक देखील केली. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी मामा हा भाच्याला ‘जेथे भेटेल, तेथे म्हणायचा, तुकडे करून फेकून देईन’, अशी धमकी देत होता, अशी माहिती तपासादरम्यान निष्पन्न झाली आहे.
सवगेश नरलेश पवार (२३, रा. राजुरा) याचा मृतदेह १३ जानेवारी रोजी सकाळी कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाईलद्वारे मृताची ओळख पटविण्यात आली. तथा सवगेशच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. ते आल्यानंतर १४ जानेवारी रोजी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यापुर्वीच सवगेशची हत्या करण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत कोतवाली पोलीस पोहोचले होते. त्यादृष्टीने सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. सवगेशच्या अंतिमसंस्कारानंतर १४ जानेवारी रोजी रात्री १०.१९ च्या सुमारास मृताचा भाऊ शुभम पवार (२७, ह.मु. पुणे) याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी मामा अरूण टिल्लू सोळंके (४२, रा. राजुरा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
काय आहे तक्रारीत
मामा अरूण सोळंके हा ७ जानेवारी रोजी आपल्या राजुरा येथील घरी गेला होता. त्याने सवगेश जेथे भेटेल, तेथे त्याचे तुकडे करून फेकून देईन, अशी धमकी आपल्या आईवडिलांना दिली होती. असे शुभमने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान ९ जानेवारी दुपारी चारच्या सुमारास सवगेश हा मोपेड घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर तो दोन तीन दिवसा घरी न आल्याने १२ जानेवारी रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. आपला मामा अरूण सोळंके यानेच एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या रागावरून आपल्या भावाला जीवाने मारून टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी अरूण सोळंकेविरूध्द २१ गुन्हेआरोपी अरूण टिल्लू सोळंके हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर सन २०१७ मध्ये फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर, अन्य गुन्हे हे चोरी, घरफोडीशी संबंधित आहेत. त्याच्यावर फ्रेजरपिरा, बडनेरा, राजापेठ, वलगाव, भातकुली तसेच ग्रामीणमधील वरूड, बेनोडा व खोलापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी दिली.
आरोपी अरूण सोळंकेविरूध्द शहर तथा ग्रामीण पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. - विजयकुमार वाकसे, ठाणेदार, कोतवाली.