फोटो पी १८ नेरपिंगळाई
नेरपिंगळाई : ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभारामुळे आठवडी बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. हा आठवडी बाजार की, डंम्पिंग ग्राऊंड, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गटारात बसून विक्रेते व्यवसाय करीत असल्याचे भयावह चित्र आहे.
बाजारात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी, पाण्याचे डबके, जनावरे, श्वान व वराहांचा सुळसुळाट, प्रसाधनगृहाची गैरसोय यामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. बाजारात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. याचा विक्रेत्यांना आणि ग्राहकांना तसेच परिसरातील नागरिकांनाही त्रास होत आहे. पाणी साचल्याने काही विक्रेते आणि ग्राहक घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील हजारो नागरिक व भाजीपाला विक्रेते, खाद्य पदार्थ या बाजारात येतात. शिवाय, दर दिवशी या ठिकाणी गुजरी बाजार भरतो. ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आठवडी बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. आठवडी बाजाराची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करणे कठीण झाले आहे. बाजार पूर्णपणे घाणीच्या साम्राज्यात भरतो तरीही यावर कुठल्याच पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, येथील सरपंच यांनी आजपर्यंत कोणतीच ठोस उपाय योजना केलेले नाहीत असे दिसून येत आहे.