अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बीएड परीक्षांचे नियोजन केले, त्याच कालावधीत नेट परीक्षा होत आहे. त्यामुळे बीएड द्वितीय सेमिस्टरची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर करून तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
अमरावती विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षेत तीन दिवसांचा कालावधी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास विद्यापीठाने तीनच दिवस दिले आहेत. त्यात नेटची परीक्षा व बीएड द्वितीय सत्राच्या परीक्षा एकाच कालावधीत आल्याने विद्यार्थ्यांना नेटच्या परीक्षापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच बीएड द्वितीय सत्राचा अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण झाला नसल्याने विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्यातील शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन द्वितीय सत्राच्या परीक्षा पुढे घेण्यात यावी, अशी मागणी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना निवेदनातून केली आहे.
यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. कोणत्या परीक्षांना प्राधान्य द्यावे याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना काही बाबी तपासल्या नाहीत. या ढिसाळ नियाेजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून, बीएड आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नेट परीक्षेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.