अमरावती : लग्न जुळले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख जवळ आली.अन् ऐनवेळी वर पक्षांनी वधू पक्षाकडे हुंड्याची मागणी केली. विवाह मंडपात वधू पक्षाची मंडळी पोहचली. विवाहापूर्वी हुंडा मिळत नसल्याचे पाहून अखेर वर पक्षाने विवाह मंडपात येण्यास नकार दिला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक यशोदानगरनजीकच्या चैतन्य कॉलनी येथील रहिवासी काजल (काल्पनिक नाव) हिचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी हर्षवर्धन ऊर्फ हरीश अजाबराव सरदार या युवकाशी जुळला होता. ६ एप्रिल रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखपुडा दरम्यान वधू पक्षाने वर पक्षाच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या. परंतु ८ एप्रिल रोजी वर पक्षाच्या मंडळींनी वधू पक्षाकडे पुन्हा एक लाख रुपये हुंड्याची मागणी केली. ३0 मे रोजी काजल व हर्षवर्धनचा विवाह शहरातील एका मंगल कार्यालयात संपन्न होणार होता. त्यासाठी वधू पक्षाकडून सर्वत्र लग्नपत्रिका वितरित केल्या होत्या. ठरल्याप्रमाणे वधू पक्षाकडील संपूर्ण मंडळी विवाहस्थळी पोहचली. परंतु हुंडा मिळत नसल्याचे पाहून वर पक्षाकडील मंडळीने विवाह मंडपात पोहचण्यास नकार दिला. विनंती करुनही वर पक्षाची मंडळी त्यांच्या निर्णयावर ठाम होती. अखेर हताश मुलीच्या पित्याने फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी हर्षवर्धन सरदार, अजाबराव सरदार, बेबी सरदार, दादू सरदार, शुद्धोधन सरदार, दिलीप सरदार, देवगन सरदार, दादाराव वानखडे (सर्व रा.गोरेगाव, ता. मूर्तिजापूर ) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन् विवाह मंडपात नवरदेव पोहोचलाच नाही
By admin | Published: June 02, 2014 12:52 AM