अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याशिवाय नवीन शैक्षणिक वर्षात घाईघाईने शाळा सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षण विभागाने गेल्यावर्षी १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू केले होते. शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली. आता शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी लागली आहे. १४ जून तर विदर्भातील शाळा २८ जूनपासून सन २०२१-२२ चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष जरी सुरू झाले तरी, लगेच शाळा सुरू करण्यात येणार नाहीत. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग झाल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळून आले, तर तुलनेने पहिल्या लाटेत हे प्रमाण जवळपास नव्हतेच. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शाळकरी बालकांना अधिक आहे. धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने पालकांची चिंता वाढू लागली आहे. तसेच कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठविणार असल्याची भूमिका पालकांनी सतत स्पष्ट केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण समितीने शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
बॉक्स
आरोग्य सुविधेला महत्त्व
आरोग्य सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना घरात राहूनच शिक्षण घेता यावे, यासाठीच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. बालभारतीची पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. विद्या प्राधिकरणाकडूनही विविध माध्यमांतून ऑनलाईन शिक्षण देण्याच्यादृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोट
शाळा सुरू होण्याअगोदर २ ते १८ वर्षांच्या सर्व मुलांचे लसीकरण करण्यात यावे. ही मोहीम गावपातळीवर शासनाने राबवावी.
- राजेश सावरकर
राज्य प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती