- प्रदीप भाकरेअमरावती : नवजात बालकांमध्ये आढळून येणाऱ्या कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांच्या अटकावासाठी न्यू बॉर्न स्क्रीनिंग केले जाणार आहे. नवजात बालकांची ही तपासणी राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधून करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.राज्यात प्रतिवर्षी अंदाजे २० लाख बालके जन्माला येतात. एसआरएस २०१६ नुसार राज्याचा अर्भक मृत्युदर १९ व नवजात मृत्युदर १३ आहे. परंतु, होणा-या एकूण बालमृत्यूपैकी ७० टक्के हे नवजात बालकांचे होत असल्याने नवजात बालकांची वेळेत तपासणी व निदान होऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविले आहे. नवजात बालकांमध्ये कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांची शक्यता अधिक असते. असे आजार झालेल्या मुलांची तपासणी न्यू बॉर्न स्क्रीनिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने सन २०१६-१७ मध्ये नवजात बालकांची राज्यातील आरोग्य संस्थांमधून तपासणी करून घेण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने यंदा त्यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या मंजूर अनुदानातून राज्यातील नवजात बालकांची उपयुक्त तंत्रज्ञानाचा उपयोग करून तपासणी करून घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी तपासणी करताना लागणारी साहित्य व उपकरणांसाठी हा निधी देण्यात आला आहे. अत्यावश्यक साहित्य, उपकरणाची खरेदी आरोग्य संस्थांना यातून करता येईल.काय आहे कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम?कंजेनाइटल हायपोथायराइडिजमचे निदान झाल्यास बाळाला थायरॉइड हार्मोन्सच्या बदलावर उपचार सुरू केले जातात. जन्मानंतर लगेचच निदान झाल्यास मेंदूला होणारे नुकसान टाळता येऊ शकते. हायपोथायरायडिजमग्रस्त अनेक मुलांना थायरॉइडचे हार्मोन्स संपूर्ण आयुष्यभर घ्यावे लागतात.काय आहे कंजेनाइटल अॅडनेरल हायपरप्लाशिया?कंजेनाइटल अॅड्रेनल हायपरप्लाशिया हा एक आनुवांशिक स्थितीचा संग्रह आहे. हार्मोन बनण्याच्या प्रक्रियेला मर्यादित करून अॅड्रेनल ग्रंथी कोर्टिसोलचे उत्पादन करू शकत नाही. हा आजार मुलांची सामान्य वाढ आणि विकासात अडसर निर्माण करतो.
आरोग्य संस्थांमधून न्यू बॉर्न स्क्रीनिंग, आजारी नवजात मुलांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 5:04 PM