संख्या वाढली, किनवटनजीकचे पैनगंगा, यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यात वाघांचा मुक्त संचार
अमरावती : विदर्भ ही वाघांची भूमी आहे. मात्र, आता मराठवाड्यातही वाघांची संख्या वाढत असून, येत्या काळात मराठवाडा ते विदर्भ असे वाघांचे नवे कॉरिडॉर तयार होणार आहे. यात मराठवाड्यातील किनवट येथील पैनगंगा अभयारण्य मोलाची भूमिका बजावणार आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, त्यापैकी एकट्या विदर्भात मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सह्याद्री अभयारण्य आहे. विदर्भात संपन्न जंगलासह वाघांची संख्याही वाढत आहे. त्यापाठोपाठ आता किनवट (जि. नांदेड) येथील पैनगंगा अभयारण्यात पाच वाघांची व त्यांच्या तीन छावांची नोंद झालेली आहे. यामुळे भविष्यात पैनगंगा (किनवट) ते टिपेश्वर (पांढरकवडा) व पुढे ताडोबा असा वाघांचा नवा कॉरिडॉर सुरू होईल, असे संकेत वन्यजीव विभागाने दिले आहेत.
पैनगंगा अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यजिवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. येथील वाघ भ्रमंतीवर असतात. पैनगंगा अभयारण्याने ३२४ चाैरस किमी क्षेत्र व्यापले असून, यवतमाळात त्याचा अधिक भाग यात समाविष्ट आहे. वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, चिंकारा, चितळ हे मुख्य वन्यप्राणी पैनगंगा अभयारण्यात आहेत.
--------------
पैनगंगा अभयारण्य : ५ वाघ
टिपेश्वर : २५ वाघ
काटेपूर्णा : ५ वाघ
ताडोबा-अंधारी : ८५ वाघ
-------------------
बॉक्स
असा असेल नवा कॉरिडॉर
मराठवाड्यातील किनवट पुढे आर्णी, यवतमाळ, पांढरकवडा, वणी, भद्रावती, चंद्रपूर, ताडोबा-अंधारी
---------------
पैनगंगा, टिपेश्वर पुढे ताडोबा-अंधारी असा वाघांचा कॉरिडॉर निर्माण झाल्यास वावगे ठरू नये. वाघांत दरदिवशी ८ ते १० किमी प्रवास करण्याची क्षमता आहे. सहचारिणी अथवा शिकारीसाठी तो नजीकच्या जंगलात ये-जा करू शकतो. भविष्यात मराठवाडा ते विदर्भ असा वाघांचा नवा कॉरिडॉर निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर