अमरावती : शिक्षण हा केंद्र व राज्य या दोन्हीच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. नवीन शैक्षणिक धोरण हे गरिबांवरील फार मोठे संकट असून या धोरणाशी राज्याने शंभर टक्के सहमत होऊ नये, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षणतर्फे आयोजित संस्थेच्या ‘शिवाजी डॉट लाईव्ह’ या युट्युब वाहिनीचा शुभारंभ, संस्थेची दैनंदिनी आणि शिवसंस्था त्रेमासिकच्या जयंती विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे, माजी न्यायाधीश अशोकराव ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो.ठाकरे, नरेशचंद्र पाटील, अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व रामचंद्र शेळके हे युट्यूब वाहिनीच्या माध्यमाने या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमात वीर उत्तमराव मोहिते लिखित ‘जागतिक कृषक क्रांतीचा उद्गाता’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि मंदा नांदूरकर यांच्या ‘मातोश्री विमलाबाई देशमुख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे आणि अधीक्षक दिनेश बागल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, सचिव शेषराव खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे आजीव सदस्य अशोक देशमुख, प्रभाकर फुसे, वीर उत्तमराव मोहिते यांच्या कन्या भाग्यरेखा देशमुख, प्राचार्य संयोगिता देशमुख, प्राचार्य शशांक देशमुख, कुमार बोबडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सकाळी ८ वाजतापासून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादनाची व्यवस्था करण्यात आली होती.