गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात महिनाभरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट पाहता, सात नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार नमुन्यांमध्ये जनुकीय बदल (म्यूटेशन) झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. याविषयी एनआयव्ही व आयसीएमआरकडे अधिक तपासणी व संशोधन सुरू आहे.
अमरावतीच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे ‘रेट आफ इन्फेक्शन’ जास्त आहे. संसर्गाची लक्षणे मात्र बदललेली नाहीत. यूके, साऊथ आफ्रिका व ब्राझिलियन म्युटेशनमध्ये व अमरावतीत आढळलेल्या नव्या स्ट्रेनमध्ये साम्य नाही. यात वेगळेपण असल्याची माहिती अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली.
दर महिन्याला कोरोनाचे एक ते दोन म्युटेशन होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावेळचे म्युटेशन हे ‘एच-१ व एन-१’पेक्षा वेगळे आहे व जास्त गुणाकार पद्धतीने संसर्ग करीत असल्याचे निरीक्षण आहे. एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाॅजी) व आयसीएमआर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) कडून याविषयीचा अहवाल अप्राप्त असल्याने अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.
नव्या स्ट्रेनला अद्याप नाव देण्यात आलेले नाही. सर्व व्यक्तींना या स्ट्रेनचा संसर्ग सारखाच आहे. साऊथ आफ्रिका, ब्राझिलियन व ११ यूके स्ट्रेनमध्ये एक कॉमन म्युटेशन आहे. ६८-८० डिलीशनदेखील सारखी आहेत. त्र, अमरावतीच्या म्युटेशनमध्ये हा प्रकार नाही. याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक सांगता येईल. सध्या या सर्व चर्चाच असल्याचे सूत्र म्हणाले.
डब्ल्यूएचओ व आयसीएमआरचे अमरावतीकडे विशेष लक्ष अमरावतीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे व आता नव्या म्युटेशनची नोंद झाल्याने जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) व दिल्ली येथील आयसीएमआर विशेष लक्ष ठेवून आहे व सातत्याने माहिती घेतली जात आहे.
- प्रशांत ठाकरे,
समन्वयक, अमरावती विद्यापीठ विषाणू परीक्षण प्रयोगशाळा.
पुणे ‘एनआयव्ही’ला शुक्रवारी १०० नमुने
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला यापूर्वी यूके रिटर्न व्यक्तींचे चार व नंतर नव्या स्ट्रेनसंदर्भात सात नमुने पाठविण्यात आले होते. आता शुक्रवारी पुन्हा आरोग्य संचालकांच्या निर्देशानुसार चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे १०० नमुने पाठवित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
पुणे येथील एनआयव्हीला पाठविलेल्या नमुन्यांपैकी चारमध्ये म्युटेशन बदल आढळल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयव्ही व आयसीएमआरचा अहवाल आल्यावर याविषयी अधिक सांगता येईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
७६